चार दिवसात नवी मुंबईतील सर्वच रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडीट करा

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २४ एप्रिल २०२१

      नाशिक येथील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर लगेचच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या अग्नि दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातही खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील सर्वच महापालिका तसेच खासगी रुग्णालयांसह शहरातील  सर्व कोविड केंद्रांचे  फायर, ऑक्सिजन व स्ट्रक्चरल ऑडीट पुढील ४ दिवसांत करण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शहरातील रुग्णालयांमधील फायर ऑडीट करण्याची जबाबदारी अग्निशमन विभागाचे प्रमुख  शिरीष आरदवाड, ऑक्सिजन ऑडीट करण्याची जबाबदारी ऑक्सिजन नियंत्रण नोडल अधिकारी तथा उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची जबाबदारी शहर अभियंता  संजय देसाई यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींकडून हे ऑडीट करून घेतले जाणार असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार इंजिनियरींग कॉलेजमधील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटर्स / रुग्णालयांप्रमाणेच खाजगी रुग्णालयांमध्येही ही तिन्ही प्रकारची ऑडीट केली जाणार असल्याने सर्व खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी महानगरपालिकेमार्फत फायर, ऑक्सिजन व स्ट्रक्चरल ऑडीटसाठी रुग्णालयात येणा-या पथकांना संपूर्ण सहकार्य करावे अशा सूचना महापालिका प्रशासनाक़डून देण्यात आल्या आहेत. 

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप