तिस-या टप्यात 3 दिवसात 826 नागरिकांचे लसीकरण

संध्याकाळी 5 वाजता सेशन प्रसिध्द झाल्यावर बुकींग करण्याचे आवाहन

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 5 मे 2021:

18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी तिस-या टप्यातील लसीकरणाला 1 मे पासून सुरूवात करण्यात आली आहे. या टप्यात नवी मुंबईत 3 दिवसात 826 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नेरुळ सेक्टर 15 इथल्या महानगरपालिकेच्या मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात पहिल्या मजल्यावर यासाठी विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहे. दररोज 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असून तेवढ्याच अपॉईंटमेंट पोर्टलवर निश्चित केल्या जात आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 2 लाख 31 हजार 170 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यामधील 67 हजार 805 नागरिकांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण 2 लाख 98 हजार 975 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

लसीकरणासाठी वेळ आरक्षीत कशी करावी

या लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करावयाची असून नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्याठिकाणी आपली अपॉईंटमेंट आरक्षीत करावयाची आहे. या लसीकरणासाठी दररोज संध्याकाळी 5 वाजता लसीकरण सेशन प्रसिध्द होत असून मागील 2 दिवसांचा अनुभव बघता काही मिनिटातच या पोर्टलवर सर्व अपॉईंटमेंट निश्चित होत आहेत. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजता सेशन प्रसिध्द झाल्यावर त्वरीत बुकींग करण्याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. या बुथवर दररोज 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असून तेवढ्याच अपॉईंटमेंट पोर्टलवर निश्चित केल्या जात आहेत. सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 18 ते 44 वयोगटासाठी एकच केंद्र सुरु असून याठिकाणी अपॉईंटमेंट निश्चित झालेल्या नागरिकांनीच येऊन लसीकरण करावयाचे आहे .

लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दैनंदिन वैद्यकीय अधिकारी व विभाग अधिकारी यांच्या आढावा बैठकीत केंद्र वाढीबाबत निर्देश दिले असून 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे 31 जुलैपर्यंत कमीत कमीत लसीचा 1 डोस पूर्ण होईल अशाप्रकारे नियोजन करण्यात येत आहे. सध्या महानगरपालिकेचे रुग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे अशा 28 ठिकाणी तसेच 14 खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत.

या केंद्रांमध्ये वाढ करतानाच असलेल्या लसीकरण केंद्रांठिकाणी सध्याचा मे महिन्याचा उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता व आगामी पावसाळ्याचा अंदाज घेऊन सर्व लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप घालणे तसेच खुर्च्या आणि पंख्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यादृष्टीने उपस्थितीचा अंदाज घेऊन टोकन क्रमांक दिले जावेत व नागरिकांचा साधारणत: लसीकरणासाठी क्रमांक कधी येईल याची कल्पना नागरिकांना द्यावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी फिरते लसीकरण केंद्र असावे याचेही नियोजन केले जात आहे.
—————————————————————————————————————————————-