नवी मुंबईत 186 दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण

18 वर्षावरील दिव्यांगांसाठी विशेष सत्र

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 जून 2021:

साधारणत: ऑगस्ट महिन्यात कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना त्यापूर्वीच दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण केले जावे या भूमिकेतून 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरिता कोविड लसीकरणाचे विशेष सत्र आज 3 रूग्णालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. अशाप्रकारे 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींकरीता विशेष लसीकरण सत्र आयोजित करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका आहे.

आज दिवसभरात महापालिका क्षेत्रातील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरुळ येथे 64, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली येथे 58 आणि इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर 5 वाशी येथे 64 दिव्यांग व्यक्तींनी कोव्हीड लस घेतली. 45 वर्षावरील काही दिव्यांगांनी कोविड लसीच्या दुसरा डोस घेतला.

दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवेसुविधा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांकरीता महानगरपालिका करीत असलेले कार्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. हाच दिव्यांग कल्याणकारी दृष्टीकोन कोविड लसीकरणातही जपण्यात आलेला आहे. म्हणूनच 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना रांग न लावता लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

दिव्यांग व्यक्ती हा समाजातील एक महत्वाचा घटक असून त्यांची आवश्यक काळजी घेतली गेली पाहिजे. या भावनेतून 18 वर्षावरील दिव्यांगांकरिता हे विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले.  आजच्या सत्रात काही दिव्यांग राहून गेले असल्यास आणखी एकवार अशाप्रकारचे सत्र आयोजित करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.

——————————————————————————————————