“दामिनी ॲप” देणार वादळी पाऊस, वीज पडण्याचा इशारा

नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, आणि आयआयटीएम यांचा उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • अलिबाग, 31 मे 2022:

मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः माहे मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच. तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था (आयआयटीएम) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता हे ॲप विकसित केले आहे. “दामिनी” ॲपसाठी आयआयटीएमने “लाइटनिंग लोकेशन नेटवर्क” हे मॉडेल विकसित केले आहे. या (Damini Lightning Alert) ॲप च्या माध्यमातून त्यांच्या परिसरातील वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.

     मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. विजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी हे दामिनी ॲप उपयोगी ठरणार आहे.

ॲप काम कसे करते

माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसविण्यात आले आहेत. या ॲपमुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे पंधरा मिनिट ते अर्धा तास आधी अचूक अंदाज मिळू शकतो. हे अॅप जीपीएस (GPS) लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी या ॲपमध्ये प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राची दिशादर्शक स्थिती दर्शविण्यात येते. विजा पडण्याची शक्यता तसेच वीज म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि विजेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर सचित्र माहिती “दामिनी” ॲप मध्ये देण्यात आली आहे. या ॲप (Damini Lightning Alert )वर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा विजेच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळते. त्यामुळे या माहितीच्या आधारावर शेतकरी व नागरिक वेळीच सावध होऊन त्यांचा जीव वाचवू शकतात.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हे ॲप गुगल प्ले स्टोर मध्ये “Damini Lightning Alert” असे टाईप करून डाऊनलोड करावे तसेच स्थानिक पातळीवर गावस्तरीय कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हे ॲप स्वत:डाऊनलोड करावे तसेच सामान्य नागरीक / शेतकरी यांनाही हे ॲप डाऊनलोड करण्यास मार्गदर्शन करावे, असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
——————————————————————————————————