साक्षी शिंदे १२वी विज्ञान शाखेत पाचल पंचक्रोशीत प्रथम

सरस्वती विद्यामंदीर पाचल शाळेचा शंभर टक्के निकाल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • राजापूर, हरळ, ९ जून २०२२

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पाचल येथील सरस्वती विद्यामंदीर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष बाब म्हणजे या शाळेत शिकणारी हरळ गावची सुपूत्री साक्षी निशिकांत शिंदे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळवून पंचक्रोशीत पहिली येण्याचा मान मिळवला आहे. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे. साक्षी शिंदेला वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असून त्यासाठी आपण पुढील तयारी करीत असल्याचे तिने सांगितले.

 

ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची वानवा असतानाही अनेक हुशार विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या बळावर यशाची उत्तुंग शिखरे गाठत असल्याचे आपल्याला अनेक वेळा दिसून येते. साक्षी ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. आईवडील शेतकरी असून रोजंदारीवरही काम करतात. आपल्याप्रमाणे मुलांना त्रास होवू नये म्हणून मुलांनी खूप शिकावे यासाठी ते नेहमीच झटत असतात. त्यामुळेच साक्षी आणि तिचा लहान भाऊ निनाद यांनी शिक्षणावर आपले लक्ष केंद्रीत केले. सरस्वती विद्यामंदीर पाचल या शाळेत शिकणाऱ्या साक्षीला दहावीला ९५.८० टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

आपल्या या यशाचे श्रेय साक्षी आईवडील आणि मित्र मैत्रिणींना देते. तसेच शाळेतील मुख्याध्यापक सध्दार्थ जाधव, शिक्षक धनाजी भोसले, सत्यनारायण देसाई, शानू पिरजादे, निलेश  राजाध्यक्ष, दिपक सुर्वे, अजित वनकुंद्रे या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवणे शक्य झाल्याचे साक्षी सांगते.

दरम्यान, सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे दरवर्षी हरळ तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात येते. तसेच होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात. यावर्षी १२ वीच्या परिक्षेत पंचक्रोशित पहिल्या आलेल्या साक्षीला पुढील शिक्षण घेण्यासाठी शक्य तेवढी मदत करू, असे सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरळकर यांनी सांगितले.

=================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप