राज्यातील सर्व बसस्थानकांचे नुतनीकरण करणार

मुंबई, 15 मार्च 2018/ अविरत वाटचाल न्यूज:

राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांचे नुतनीकरण करुन त्यामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कामासाठी आर्थिक तरतूदही उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत दिली.

 

नियम 92 अन्वये सदस्य अमरसिंह पंडित यांनी मराठवाड्यातील एसटी बसस्थानकांच्या दुरावस्थेबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर रावते  म्हणाले की, एसटी स्थानकांच्या नुतनीकरणाच्या कामांतर्गत सर्व स्थानके आधुनिक करण्यात येतील. ही कामे महामंडळ स्वत: करणार आहे. स्थानकाबरोबरच आजुबाजूच्या परीसराचाही विकास करण्यात येणार आहे.

निवृत्त सैनिकांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमणार

  • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी स्थानकावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या असून हे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. सैन्य दलातील सेवानिवृत्ताना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे, असे रावते यांनी सांगितले.

एसी वेटींग रुम बांधणार

  • एसटी स्थानकातील शौचालय सुयोग्य पद्धतीने करण्याचे काम करण्यात येणार आहे. शिवनेरी, शिवशाही बसेसच्या प्रवाशांकरीता बसण्यासाठीसुद्धा वातानुकूलीत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही स्थानके विमानतळाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. तसेच विमानतळाच्या धर्तीवर वाहनतळ तयार करण्यात येणार आहे,असेही रावते यांनी यावेळी सांगितले.

 

या चर्चेत जयवंतराव जाधव, हेमंत टकले आदी सदस्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

————————————————————————————————————————————————————————————————————-


हरबऱ्याच्या पानांची चुलीवरची भाजी