सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती गणेशमूर्तींसाठी 2 फूटांची मर्यादा

  • नवी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 जुलै 2022:

31 ऑगस्ट ते  09 सप्टेंबर 2022 या कालावधीत सुरू होणा-या गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणेशोत्सव करिता 2 फूटांच्या मर्यादेची अट घालण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीं ऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता 14 जुलै पासून परवानगी अर्ज सादर करण्यासाठी सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी  सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळे व नागरिक यांना नवी मुंबई महापालिकेच्या www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा सुरु करण्यात येत आहे. तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईटवर मंडप उभारणेकरिता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे दोन्ही उत्सवाच्या १० दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे. लेखी परवानगी मिळाल्याशिवाय मंडप उभारणी करू नये अशीही सूचना महापालिकेने या नियमावलीत केली आहे.

 

26 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत मागील वर्षी 29 जून 2021 अन्वये शासनाच्या गृह विभागाकडील परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार खालीलप्रमाणे नियमावली

  • 1.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची, त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी  घेणे आवश्यक राहील.
  • 2.कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा.न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
  • 3.श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणेशोत्सव करिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
  • 4.यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीं ऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • 5.उत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • 6.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • 7.वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील.
  • 8.आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.
  • 9.‌ श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • श्रीगणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनिटायझर इ.) पालनाकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
  • महानगरपालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
  • कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय व शिक्षण विभाग तसेच संबधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील  अनुपाल करावे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १७३/२०१० संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षाप्रमाणे या वर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महानगरपालिकेने विकसीत केली आहे.

गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये. तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहित धरु नये. परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ/नागरिकांनी याची दक्षता घ्यावी.

मंडप उभारणी परवानगी अर्ज उपरोक्त नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे तसेच www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावेत.
——————————————————————————————————

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप