मोरबे धरण कर्मचाऱ्यांनी स्विकारले महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15  जुलै 2022

मोरबे धरणावर काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनी इंटकशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व स्विकारले . यावेळी कामगार नेते तसेच नवी मुंबई इंटकचे आणि महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी मोरबे धरण कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले.

यावेळे कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत. मोरबे धरण बांधण्यात आले, तेव्हापासून महाराष्ट्र शासनाच्या एमजीपीमध्ये काम करत होतो. मोरबे धरण एमजीपीकडून महापालिकेने विकत घेतले. त्यावेळीही सेवा गमविण्याचा धोका निर्माण झाला. संघर्ष केल्यावर, आंदोलन केल्यावर महापालिकेने सेवेत सामावून घेतले. मात्र पालिका प्रशासनाने जुनी एमजीपीमध्ये काम केल्याची सेवा गृहीत न धरता पालिकेत रूजु झाल्यापासूनची सेवा गृहीत धरलेली आहे. त्यामुळे सेवा कमी झालेली आहे. आमच्या जमिनीवर मोरबेचा प्रकल्प असतानाही प्रशासनदरबारी आम्हाला न्याय भेटत नाही, कोणी दखल घेत नाही, अशी खंत या कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

आता दिवसांनी आम्ही सेवेतून निवृत्त होवू , आम्ही निवृत्त झाल्यानंतर आमच्या वारसांना नोकऱ्या देण्यात याव्या. प्रकल्पासाठी शेतजमिनी गेल्याने नोकऱ्या नसल्यास आमच्या परिवाराने उदरनिर्वाह कसा करायचा, सेवा कमी झाल्याने पेन्शन लागू होणार नाही. आमच्या जमिनीवर उभ्या राहीलेल्या प्रकल्पातून नवी मुंबई शहर व इतरत्र पाणीपुरवठा होत असताना भविष्याच्या चिंतेने आता आमच्या तोंडचे पाणी पळाले असल्याचा संताप यावेळी बैठकीत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी मोरबे  धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सोडवणूक करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी युनियनचे तथा इंटक नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, वाहनचालक विभागाचे युनिट अध्यक्ष राजेंद्र सुतार, उपाध्यक्ष कृष्णा घनवट, मुख्यालयातील राजेंद्र देशमुख उपस्थित होते.

मोरबे धरण प्रकल्प कामगार सदानंद राणे, श्रीकांत देशमुख, हरीश्चंद्र भोसले, विश्वास जाधव, महेंद्र निकाळजे, शंकर मोरे, अरविंद गायकवाड, पंडित धुळे, सुरेश शिंदे या प्रतिनिधींनी महाराष्ट्र कर्मचारी युनियनमध्ये प्रवेश केला.