कालबाह्य ठरल्याने रक्तपेढीतील रक्त वाया

मुंबई, 26 जुलै 2017/AV News Bureau:

भगवती रुग्णालय रक्तपेढीमार्फत 2012 ते 2016 या काळात 12 हजार 57 पिशव्या रक्त जमा करण्यात आले. मात्र 822 पिशव्या संसर्गित असल्याचे आढळल्यामुळे तसेच 780 पिशव्यांतील रक्त वापराअभावी कालबाह्य ठरल्यामुळे नष्ट करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तराद्वारे विधानसभेत दिली.

मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या रक्तपेढीत जमा केलेल्या हजारो रक्ताच्या पिशव्या गैरव्यवस्थापनामुळे वाया गेल्याबाबतचा तारांकीत प्रश्न अबु आजमी, भाऊसाहेब कांबळे, राधाकृष्ण विखे पाटील, सुनिल शिंदे आदींनी काल विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात ही बाब मान्य केली आहे.

भगवती रुग्णालयाच्या रक्तपेढीतील एकूण 1 हजार 602 रक्ताच्या पिशव्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे संकलित केलेल्या रक्ताच्या पिशव्या कालबाह्य होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना बृहन्मुंबई महापालिकेस देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. संकलन केलेले रक्त रक्तपेढ्या, सरकारी रुग्णालयांमध्ये जमा केले जाते. मात्र योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे मौल्यवान रक्त वाया जात असल्याचे उघडीस आले आहे. त्यामुळे गरजूंसाठी रक्त उपलब्ध व्हावे या भावनेतून रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शासनाने संकलित होणाऱ्या रक्ताचा तातडीने गरजूंना पुरवठा केला जावा तसेच अतिरिक्त जमा होणारे रक्त शास्रोक्तपद्धतीने सुरक्षित ठेवण्याची गरज आहे.