कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ सेवानिवृत्त

नवी मुंबई महापालिका आयुक्त, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारीसह अनेक महत्वाची पदे भुषविली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 जुलै 2021

कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ 30 जून रोजी 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी  अनेक महत्वाची पदे सांभाळली आहेत. विभागीय आयुक्त हे पद शेवटच्या माणसापर्यंत शासन योजना राबविण्याची सर्वात मोठी यंत्रणा आहे, असे मत कोंकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.

कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम  मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • आयएएस अण्णासाहेब मिसाळ यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा

सनदी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ 11.6.1987 रोजी एमपीएससी परिक्षेतून निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर या पदावर शासकीय सेवेत दाखल झाले. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे उप आयुक्त (महसूल) या पदावर कार्यरत असतांना अण्णासाहेब मिसाळ यांनी नेदरलँन्ड येथे 1 वर्ष प्रशासकीय कामांसंबंधीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड येथे कार्यरत असतांना ग्रामीण भागातील आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, कुपोषण तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी इंदिरा आवास योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली.

अण्णासाहेब मिसाळ यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हा परिषदेला या कामगिरीकरीता राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून सन 2014 मध्ये यशवंत पंचायत राज पुरस्कार प्राप्त झाला. धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी म्हणून कार्यरत असतांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व तरुणांकरिता रोजगार निर्मितीसाठी 10 लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष ठेवून मुंबई येथे मॅग्नेटीक महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावर  कार्यरत असतांना कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या सुरुवातीच्या काळात नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी अण्णासाहेब मिसाळ यांनी शासनाच्या विविध उपाय योजना प्रभावीपणे राबविल्या. नवी मुंबई ग्रीन सिटी करणेसाठी उद्याने विकसित करण्यासंबंधीचा मोठा प्रकल्प हाती घेतला. या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ महानगरपालिका म्हणून सन्मानित करण्यात आली.

Other Video On Youtube

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप

अण्णासाहेब मिसाळ हे विभागीय आयुक्त कोकण विभाग या पदावर कार्यरत असतांना महाआवास अभियान-ग्रामीण योजनेत कोकण विभाग राज्यात अग्रेसर ठरला. कोरोना आपत्तीचा सामना करीत असतांना कोकण विभागात उद्भवलेल्या निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून आपत्तीग्रस्तांना वेळेत मदत पुरविण्याबाबत मोलाचे प्रयत्न केले.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप