तथाकथित जी-23 नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर: नाना पटोले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क 
  • मुंबई, 30 ऑगस्ट 2022

काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्वाची पदे दिली पण आज त्याच गांधी परिवाराविरोधात चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने व गांधी कुटुंबाने 50 वर्षात सर्व महत्वाची पदे दिली परंतु आझाद व तथाकथीत जी 23- नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रशिक्षण व प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरास भेट देऊन काँग्रेसजनांना संबोधित केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. प्रदेश काँग्रेस आयोजित “प्रशिक्षण व प्रबोधन समिती”चे प्रशिक्षण शिबिर नवी मुंबई येथे पार पडले यावेळी या समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, मी खासदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याचे वीज, पाणी कनेक्शन कापले होते. पण गुलाम नबी आजाद हे  कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना दिल्लीत त्यांचा सरकारी बंगला व सोयी सुविधा अजूनही कायम आहेत. ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला बदनाम करत आहेत. देशात आज गंभीर परिस्थिती आहे, सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत, संविधान धोक्यात आहे, अशावेळी भाजपाला प्रश्न विचारण्याऐवजी हे नेते काँग्रेस पक्षालाच बदनाम करण्याचे काम करत आहेत.

भाजपा देशभरात हायवेचे जाळे पसरवल्याचा डंका पिटत आहे पण त्यासाठी काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दर महिन्याला ४४ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. जनतेवर एवढा मोठा कर्जाचा बोझा टाकून विकास कसला करता. मुंबई- गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे, खड्डे बुजवण्याचे आदेश दिले तरी ते बुजवले जात नाहीत. या खड्ड्याने अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. कारण भाजप सरकारमधील लोकच या रस्त्यांचे ठेकेदार आहेत, त्यांना फक्त मलिदा खायचा आहे. देशभरातील हायवे असो वा समृद्धी महामार्ग असो यात किती पाप लपले आहे हे येणाऱ्या काळात समजलेच,असेही पटोले म्हणाले.