पोलिसांना  मालकी हक्काचे घर मिळणार

भाडेतत्वावरील घरे योजनेअंतर्गत पाच टक्के घरे राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई,13 जुलै 2017/AV News Bureau:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने भाडेतत्त्वावरील घरे योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या महानगर क्षेत्रातील सदनिकांमधील पाच टक्के सदनिका या पोलीसांसाठी तसेच पाच टक्के सदनिका वर्ग 3 व वर्ग 4 च्या प्राधिकरणाच्या व शासकीय कर्मचारी यांच्यासाठी मालकी तत्त्वावर देण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

एमएमआरडीच्या संचालक मंडळाची 143 वी बैठक आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली

प्राधिकरणाच्या वतीने भाडे तत्वावरील घरे योजनेअंतर्गत सदनिका बांधून वाटप करण्यात येतात. या योजनेअंतर्गत पालिका तसेच नागरी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या  व त्या सदनिकांच्या वाटपाचे धोरण न ठरलेल्या 320 चौरस फूटाच्या 21 हजार 672 सदनिकांच्या वाटपाचे धोरण यावेळी ठरविण्यात आले.

या सदनिका ठाणे महानगरपालिका व मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि प्राधिकरणाच्या क्षेत्रात आहेत. या सदनिका प्राधिकरणाच्या वर्ग 3 व 4च्या कर्मचाऱ्यांसाठी 1 टक्के व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 4 टक्के अशा एकूण 1 हजार 84 सदनिका राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उर्वरित सदनिकांमधील पाच टक्के म्हणजे सुमारे 1 हजार 84 घरे या पोलिसांना मालकी तत्वावर देण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.