नमुंमपा महिला कर्मचाऱ्यांनी पाककला व रांगोळी स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद देत घडविले कलागुणदर्शन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 16 डिसेंबर 2023

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदामध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या 1 जानेवारी 20124 रोजी संपन्न होणाऱ्या 32 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना विशेष सहभाग घेता यावा याकरिता पाककला व रांगोळी स्पर्धेचे नमुंमपा मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले व   विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता  संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  सत्यवान उबाळे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर, भांडार विभागाच्या उपआयुक्त् मंगला माळवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त्‍ शहर अभियंता शिरीष आरदवाड, शिक्षणाधिकारी  अरुणा यादव यांनी उपस्थित राहून सहभागी महिला स्पर्धकांना प्रोत्साहीत केले.अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या पाककला स्पर्धेमध्ये 23 तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये 17 अधिकारी, कर्मचारी महिलांनी सहभागी होत स्पर्धा उपक्रम यशस्वी केले.

पाककला स्पर्धेकरीता 2023 या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पदार्थ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये गहू आणि तांदूळ ही धान्ये वगळता ज्वारी, बाजरी, राजगीरा, नाचणी या धान्यांचा वापर करुन पदार्थ सादर करण्याची अट होती. त्यानुसार 23 महिला कर्मचाऱ्यांनी बनविलेल्या व आकर्षक रितीने मांडून ठेवलेल्या पदार्थांच्या डिशेशचे परीक्षण भारती विदयापीठ हॉटेल मॅनजमेंट विभागाचे प्राध्यापक श्री. आदित्य जोशी व श्री. हर्षल अठनीकर यांनी केले.

रांगोळी स्पर्धेकरीता चांद्रयान-3 यशस्वी मोहीम, माझी नवी मुंबई माझा अभिमान (स्वच्छ, सुंदर नवी मुंबई), प्रदूषणमुक्त भारत हे तीन विषय देण्यात आले होते. यामध्ये 17 महिला कर्मचाऱ्यांनी सुरेख रांगोळया रेखून त्यासोबत प्रबोधनात्मक संदेशही प्रसारीत केले. सुप्रसिध्द रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापनदिन समारंभात या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे.

========================================================


========================================================