सरकारने कर्जमाफीची माहिती जाहीर करावी

राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार

मुंबई,24जुलै 2017/AV News Bureau:

सरकारने कर्जमाफी जाहीर केली तरी अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही. जाहीर केलेले दहा हजार रूपये अनुदान किती शेतकऱ्यांना मिळाले ? तसेच किती जिल्हा बँकांनी शेतकऱ्यांना पैसे दिले ? याची माहिती सरकारने त्वरीत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांनी विधानसभेत केली.

सरकारकडून कर्जमाफीबाबत आम्हाला माहिती मिळावी, तो आमचा अधिकार आहे. रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कर्जमाफी होऊन एक महिना उलटला तरी अद्याप कर्जमाफीबाबत नेमकी स्पष्टता नाही. सभागृहात कर्जमाफीवर चर्चा केली तरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील. या सरकारला पाठिंबा देणारे राजकीय पक्षसुध्दा संभ्रमावस्थेत आहेत. शेतकरी आता चोवीस तासही वाट पाहू शकत नाहीत. तेव्हा या सरकारने शेतकऱ्यांची दखल घ्यावी,असेही पवार म्हणाले.