खासदार चषक कबड्डी ः रत्नदिप, माऊली, शंभूराजे, संभाजी संघांची विजयी सलामी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 6  जानेवारी 2023
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष ब गटात रत्नदिप, माऊली, श्री शंभूराजे क्रीडा मंडळ, संभाजी क्रीडा मंडळ या संघांनी विजयी सलामी दिली.
पहिल्या  फेरीच्या लढतीत बोरीवलीच्या श्री शंभूराजे क्रीडा मंडळाने दहिसरच्या भैरवनाथ क्रीडा मंडळाला २५-१५ गुणांनी सहज नमविले. विजयी संघाच्या श्रीकृष्ण देसाईने तुफानी चढाया केल्या तर जयेश शेट्टीने सफाईदार पकडी केल्या. पराभूत संघातर्फे अरुण मोहिते चमकला. दुसऱ्या सामन्यात रत्नदिप ने शूर संभाजी संघाचे आव्हान ३०-१७ गुणांनी परतवून लावले. सुशांत जांमळी, चिंतामणी सुशांत विजयी संघाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघातर्फे राहुलची झुंज एकाएकी ठरली.
गौरेश गयाडे आणि अभी बालगुडे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर माऊलीने  गरुडझेप संघाचा २१-११ गुणांनी पराभव केला. गरुडझेपच्या अभी सावंतने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. संभाजी क्रीडा मंडळाने कोकण रत्न क्रीडा मंडळाला एकतर्फी लढतीत ४७-२९गुणांनी सहज नमविले. विजयी संघाच्या साहिल दळवीने पल्लेदार चढाया करून कोकणरत्नचा बचाव मोडीत काढला. साहिलला सर्वेश भिमराव ने आकर्षक पकडी करून छान साथ दिली. पराभूत संघाचा भावेश जंगले चमकला. गोरेगावच्या दत्तसेवा क्रीडा मंडळाला पहिल्या दिवशी संमिश्र यश लाभले. पहिल्या सामन्यात दत्त सेवाने शिवसाईला संघावर सहज विजय मिळवला. परंतु दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना नेताजी सुभाषकडून हार खावी लागली. प्रतिक म्हात्रे आणि प्रतिक मते या दोघांनी आकर्षक खेळ करून नेताजी सुभाषच्या विजयात मोठा वाटा उचलला.
खासदार गोपाळ शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जया शेट्टी, छाया शेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संतोष सिंग, निषाद कोरा, गणेश बारे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू करिष्मा म्हात्रेने खेळाडूंच्यावतीने शपथ घेतली.
=======================================================
  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

=======================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र