जुगार खेळणाऱ्या महावितरणच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई

  • सात कर्मचारी निलंबित; एक कंत्राटी कर्मचारी कामावरून कमी
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
कल्याण,४ डिसेंबर २०१९

महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग-४ अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना जुगार खेळतांना आढळलेल्या ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.

वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहायक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहायक विनोद तुकाराम बोबले तसेच कंत्राटी कामगार सुनील पांचाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हे कर्मचारी लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील टेबलवर जुगार खेळतांना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन गांभीर्याने घेत महावितरणने तडकाफडकी कारवाई केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली.

निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यापूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा