महापे एमआयडीसीतून 7 बालकामगारांची सुटका

नवी मुंबई, 4 मार्च 2017/AV News Bureau:

रबाळे एमआयडीसी परिसरातील विविध हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 7 बाल कामगारांची नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी सुटका केली.

रबाळे परिसरातील अनेक हॉटेलमध्ये लहान मुलांकडून साफसफाई, भांडी धुणे, वेटरचे काम करणे, टेबल सफाई आणि इतर कामे करून घेतली जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापे एमआयडीसीमधील साई सागर, प्रितम टी आणि एकवीरा या हॉटेलवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी सात लहान मुले या हॉटेलांमध्ये काम करीत असल्याचे आढळून आले. यापैकी 5 मुले ही उत्तर प्रदेश तर एक बालक नेपाळ आणि एक झारखंड येथील रहिवासी आहे. या मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून बालकल्याण समितीमार्फत रितसर त्यांच्या  पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

याप्रकरणी हॉटेलचे मालक कांचन चौधरी, निर्मला पाटील, प्रकाश परब आदीविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालकामगार अधिनियम 1986 चे कलम 3 व 3 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.