पार्कींग व्यवस्थापनाचा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा घेतला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 मार्च 2023

मागील काही वर्षात नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यांच्या पार्कींगची मोठी अडचण जाणवत आहे. याकरिता शहरातील पार्कींग व्यवस्थेचे नियोजन हा प्राधान्याने कार्यवाही करण्याचा मुद्दा असल्याचे लक्षात घेत महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिका-यांची विशेष बैठक आयोजित करीत पार्कींग समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सांगोपांग चर्चा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे, प्रशासन व मालमत्ता विभागाचे उपआयुक्त  नितीन नार्वेकर, शहर अभियंता  संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता  मनोज पाटील व  शिरीष आरदवाड आणि इतर कार्यकारी अभियंता व सबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी शहरातील पार्कींग प्लॉटची विभागनिहाय माहिती घेत त्या प्लॉटचा सद्यस्थितीत होत असलेला प्लॉटनिहाय वापर जाणून घेतला. अभियांत्रिकी विभागामार्फत 2016 ते 2018 या कालावधीत शहरातील वाहनांचे विभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल मालमत्ता विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतरच्या काळातही शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असल्याने सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी वाढ होणा-या वाहन संख्येचा विचार करून नियोजन करावे लागेल असे आयुक्तांनी सूचित केले. त्यानुसार सिडकोकडून प्राप्त झालेल्या पार्कींग प्लॉटचा वाहने पार्कींगयोग्य विकास करण्यासाठी बहुमजली पार्कींग सुविधा विकसित करण्यापूर्वी सद्यस्थितीत समांतर पातळीवर वाहने पार्कींग सुरु होईल असे नियोजन करण्याचे व त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत अभियांत्रिकी विभागाला दिले.

सिडकोकडून पार्कींगसाठी हस्तांतरित झालेल्या भूखंडांचा पार्कींगयोग्य विकास करण्याप्रमाणेच सिडकोकडे मागणी केलेल्या मात्र अद्याप हस्तांतरित न झालेल्या पार्कींग प्लॉटची यादी तयार करून त्याविषयी अधिक प्रभावीपणे पाठपुरावा करावा व हे पार्कींग प्लॉट ताब्यात मिळण्याविषयी तत्पर कार्यवाही करावी असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मालमत्ता विभागास निर्देश दिले.

रस्त्यावर पार्कींग होणा-या वाहनांबाबत प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्रतेने करण्यात आल्यास वाहनचालकांकडून पार्कींगच्या जागांचा प्रत्यक्ष वापर सुरु होईल याक़डे लक्ष वेधत आयुक्तांनी त्यादृष्टीने वाहतुक पोलीस विभागाशी समन्वय साधून अधिक तीव्र प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले.

प्रत्येक विभागातील पार्कींग प्लॉटची सद्यस्थिती जाणून घेत आयुक्तांनी शहराच्या पार्कींग व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या दृष्टीने पार्कींग पॉलिसीमधील दरांबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले. त्यादृष्टीने सिडको व्यवस्थापनामार्फत वाशी रेल्वेस्टेशन नजीक तसेच इतर ठिकाणी आकारण्यात येणा-या दरांबाबत माहिती घेऊन ती सादर करण्याचे तसेच त्यांच्या पार्कींग धोरणाचीही माहिती घेण्याचे मालमत्ता विभागास निर्देश देण्यात आले. त्यासोबतच इतर शहरांमधीलही पार्कींग धोरणाविषयी माहिती घेऊन त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा व त्याचा तपशील सादर करावा अशा सूचनाही आयुक्तांनी मालमत्ता विभागास दिल्या.

सद्यस्थितीत शहरात असलेले नो पार्कींग झोनचा फेरविचार करून तसेच निश्चित केलेल्या पार्कींग प्लॉटप्रमाणेच मोठ्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या जागांमध्ये पार्कींग करणे शक्य आहे अशा जागा हेरून त्याचीही तपशीलवार यादी सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अशा जागांची उपयोगिता अभियांत्रिकी विभागाने तपासावी अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

सेक्टर 15 बेलापूर येथे विकसित केल्या जाणारा बहुमजली वाहनतळ विकसित करण्याचे अंतिम टप्प्यातील काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच महानगरपालिका पातळीवर संपूर्ण शहराचा वाहतुक नियोजन आराखडा तयार करून वाहतुक पोलीस विभागासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.

या बैठकीमध्ये पार्कींग व्यवस्थेच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी व त्याचा अहवाल तत्परतेने सादर करण्यात यावा असे निर्देश देण्यासोबतच आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी याबाबतचा आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येईल असे सूचित करीत नवी मुंबई शहर पार्कींग व्यवस्थापनाकडे यापुढील काळात अधिक बारकाईने लक्ष दिले जाणारअसल्याचे संकेत दिले आहेत.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र