नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 23 जुलै 2023

आजच्या धावपळीच्या युगात पिझ्झा, बर्गरसारख्या फास्ट फुडमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत असून शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. ही परिस्थिती जगभर असल्याने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरा आणि भगर या पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादनात वाढ होवून आपल्या आहारातही या धान्याचा वापर वाढावा, यासाठी या तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात खरीप वर्ष २०२३-२४ मध्ये बाजरीचे ५५ हजार ५५१ हेक्टर, ज्वारी ८ हजार ७२१ हेक्टर, नागली १ हजार ६९० हेक्टर तसेच १ हजार २८७ हेक्टरवर इतर तृणधान्य पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांनिमित्त पौष्टिक तृणधान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरा, नाचणी, राळा आदींचे उत्पादन वाढवून त्यांचा आहारात समावेश करण्यावर भर दिला जात आहे. या तृणधान्यांमध्ये उत्तम असे पोषक अन्न घटक आहेत. त्यातील तंतूमय पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात. शिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे तसेच कर्करोगापासून सुरक्षा, मधुमेह, रक्तदाब, दमा, यकृतांचे आजार आदी बाबतीत उपयोगी ठरते. ही पिके कमी पाण्यावर येणारी आहेत. त्यांचे क्षेत्र अलीकडे सुमारे ६२ टक्क्यांपर्यत कमी झाले आहे. यामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून पाळण्याचे जागतिक पातळीवर निश्चित केले आहेत.

कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहे. नाचणी, बाजरी, ज्वारी, राजगिरा,  राळा आदी पिकांचे उत्पादन वाढावे, यासाठी शेतकरी मेळाव्यांचे, चर्चासत्र, आठवडी बाजाराचे आयोजन, बियाणे विक्रेत्यांमध्ये याविषयी जनजागृती केली जात आहे.

तृणधान्यांचे आहारातील पोषणमूल्य

  • आरोग्यवर्धक ज्वारी

पोषण मूल्ये प्रथिने १०.४ टक्के, कर्बोदके – ७२.६ टक्के, स्निग्ध पदार्थ १.९१ टक्के, खनिजे – १.६ टक्के असे प्रमाण ज्वारीत असून ज्वारीमुळे ग्लुटेनमुक्त, फायबर, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, जस्त, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, खनिजे व सूक्ष्म पोषण घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, पचनास हलकी, पोटाचे, त्वचेचे आजार कमी होतात. रक्ताभिसरण वाढवते, वजन कमी करते, हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त, ऊर्जा पातळी सुधारते, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • आरोग्यवर्धक नाचणी

नाचणीमधील पोटॅशियममुळे मूत्रपिंड, हृदय व मेंदू उत्कृष्टपणे काम करतात. व्हिटॅमिन बी हे मेंदूच्या कार्यापासून ते निरोगी पेशी विभाजनापर्यंत उपयोगी, शरीराच्या कॅल्शिअम पूर्ततेसाठी उपयोगी, हाडाचे आरोग्य सुधारते, थकवा कमी करण्यास मदत, शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते. फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित, आतड्यासंबंधित आजार अथवा कर्करोगास आळा बसण्यास मदत होते.

  • आरोग्यवर्धक बाजरी

बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. बाजरीत प्रथिने अधिक, ग्लुटेन फ्री असल्याने पचनास सोपे हृदयास सक्षम करते, फॉस्फरस उच्च प्रमाणात आढळते, त्यामुळे पेशींमधील ऊर्जा व खनिज पदार्थ साठविण्यास मदत होते. लोहाचे प्रमाण असल्याने हिमोग्लोबीन वाढीस फायदेशीर आहे.

  • आरोग्यवर्धक राजगिरा

पोटॅशियम व फायबर, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळते. संधिवात, सांधेदुखी, हृदयासाठी उपयोगी. ग्लुटेन फ्री फायबरमुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, मॅग्नेशिअम अधिक प्रमाणात असल्याने मायग्रेनसाठीही उपयुक्त आहे.

  • आरोग्यवर्धक राळा

राळ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.

  • आरोग्यवर्धक वरई

नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करते.

सौजन्य ः जिल्हा माहिती कार्यालय, धुळे.

========================================================

========================================================