माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड होणार नाही: उपमुख्यमंत्री फडणवीस

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 25 सप्टेंबर 2023

 

ठाणे, दि. 25 (जिमाका) – माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, माथाडी समाजाच्या व्यथा समजून घेऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी माथाडी कामगार मेळाव्याचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर शासन गंभीरपणे विचार करीत आहे. माथाडी कामगार कायद्यातील तरतुदी बदलासंबंधीच्या मागणीवरून कामगार विभागाने सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र,त्यावेळी माथाडी नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्या सुधारणा थांबविल्या. बनावट माथाडींमुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत. माथाडी कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना जेरबंद केल्यास आपल्या माथाडी कामगार बांधवांना दोन पैसे जास्तच मिळतील. त्यामुळे माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी काळानुरुप माथाडी कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. ते करताना या कायद्याचा आत्मा बदलणार नाही, असे आश्वासन देवून फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी कायद्याला बदनाम करणाऱ्या, त्याचा दुरुपयोग करणाऱ्या घटकांना जेरबंद करणार असून त्यासाठी या कायद्यात काळानुरूप काही बदल आवश्यक आहेत. मात्र सुधारणा करताना माथाडी नेत्यांच्या सूचनाही निश्चितच विचारात घेतल्या जातील.

नाशिकच्या माथाडी कामगारांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निश्चितच लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. सिडकोच्या माध्यमातून माथाडी कामगार बांधवांसाठी घरांचा प्रश्नही येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. माथाडी कामगारांचे ज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे घेतले आहेत त्यांचे पैसे कायदेशीर मार्गाने परत मिळवून देऊ. बाजार समिती विकास आराखडा लवकरच पूर्ण करून यासंदर्भात बैठक लावून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

========================================================

========================================================