नवी मुंबईत इमारत कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबईतल्या कोपरखैरणे नोडमधील बोनकोडे गावात असलेली चौधरी बिल्डिंग ही इमारत शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत ढिगा-याखाली अडकून एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. प्रियावर्त सर्वेश्वर दत्त (अंदाजे वय ३१ वर्षे) असे या मृत व्यक्तिचे नाव आहे.

२५ वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत ३४ कुटुंब राहत होती. शनिवारी सकाळपासून ही इमारत हलत होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी करायला सुरूवात केली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला तेव्हा एका वृद्ध व्यक्तीलाही किरकोळ दुखापत झाली. त्यांचे नाव कळू शकले नाही.  सध्या घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. बचावकार्य सुरू असताना आज सकाळी सातच्या सुमारास एक व्यक्ती ढिगऱ्याखाली मृतावस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नवनियुक्त महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत तसेच जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना तशा कडक सूचना देण्याची गरज आहे,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.