सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना ठाणे, नवी मुंबईत बाजारपेठ उपलब्ध करून देणार

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 12 ऑक्टोबर 2023

बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम आहे. बचत गटांच्या उत्पादनांना मुंबई, ठाण्यासारख्या शहरात चांगली मागणी आहे. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना ठाणे, नवी मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

ही बातमी वाचा : निवडणुकीचे पडघम वाजले; पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सातारा जिल्ह्यातील बचत गटांना ठाणे व नवी मुंबईत जागा मिळणेबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते. बचत गटांच्या महिला विविध प्रकारची उत्कृष्ट उत्पादने तयार करतात. सातारा जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठ्या शहरात कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका, सिडको यांच्या अखत्यारीतील जागेत तसेच मोठ्या मॉलमध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देसाई यांनी दिले.

ही बातमी वाचा :  प्रभारी आयुक्तांकडून नवी मुंबईतील नागरी कामांचा आढावा

बचत गटातील महिला त्यांची उत्पादने उत्कृष्ट पद्धतीने पॅकेजिंग करून बाजारात उपलब्ध करून देतात. त्यांची जास्तीत-जास्त विक्री व्हावी यासाठी आपण त्या उत्पादनांचे ब्रँडिंग, मार्केटींग केले पाहिजे, त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री वाढवण्यासाठी सुद्धा नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय म्हसाळ आदी उपस्थित होते.

========================================================