नेहरू सेंटरमध्ये आजपासून पक्षी व निसर्ग  चित्रांचे प्रदर्शन

मुंबई, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:

पुण्यातील चित्रकार रेखा जाधव ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ ते १७ एप्रिल या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ हया वेळेत पाहता येणार आहे. रेखा जाधव यांनी विविध ऋतूंमधील असणार्‍या निसर्गाच्या प्रसन्न व मोहक रूपांचे तसेच विविध पक्ष्यांचे भावविश्व साकारले आहे.

 रेखा जाधव यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून कलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर सामाजिक वनीकरण (वन) विभागात शासकीय नोकरी केली. निसर्गाच्या विविध चमत्कृती तसेच निसर्गसौंदर्य ह्यामुळे प्रभावित होऊन तैलरंग, जलरंग, अँक्रिलिक, कोल्ड सिरॅमिक वगैरेचा कलात्मक वापर करून चित्रनिर्मिती केली. रेखा जाधव यांनी आपल्या चित्रात निसर्गाचे प्रत्यक्षात आढळणारे रूप व त्याचे सौंदर्य ह्यांचा कलात्मक समन्वय साधला आहे. तसेच पक्षांची चित्रे रेखाटताना त्यांच्या पंखांचे बारकावे, निसर्गातील झाडे, पाने, फुले वगैरे दर्शविताना त्यांनी निसर्गाचा समतोल विविध रंगसंगतीतून येथे प्रभावीपणे साकारला आहे.