नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आवारात सुरंगी वृक्षरोपांची लागवड

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 11 जून 2025

1.25 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नागरिकांच्या व्यापक सहभागातून नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाने सर्व विभागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणास सुरूवात केली असून नागरिकांना मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सुरंगी या सुगंधी फुलझाडाच्या वृक्षरोपाची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनीही सुरंगी वृक्षारोपाची लागवड केली.

चार पाकळ्यांची दिसायला अतिशय सुंदर असणारी सुरंगी वृक्षाची फुले आसमंत सुगंधाने भारून टाकतात. Mammea suriga या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारे सुरंगीचे झाड त्याची फुले केसातील गज-यात माळण्यासाठी उपयोगात आणली जातात तसेच दीर्घ काळ सुगंध टिकत असल्याने  सौंदर्य प्रसाधनांमध्येही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या वृक्षारोपणामध्ये सुरंगी वृक्षांची लागवड करावी असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व इतर विभागप्रमुख यांच्या हस्ते सुरंगी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.

========================================================


========================================================