युपीएससी प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आवाहन

सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत मार्गदर्शन

ठाणे,24 मे 2017/AV News Bureau:

सन 2018 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात येणा-या मोफत मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्याबाबत आले आहेत. 25 जूनरोजी सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत बांदोडकर विज्ञान विद्यालय, ठाणे येथे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी 1 जून ते 15 जून  या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्र आणि कागदपत्रांसह अर्ज करावा. यामध्ये पदवी परीक्षा गुणपत्रिका (सर्वसाधारण वर्ग 55 टक्के व राखीव वर्ग 50 टक्के गुण आवश्यक), अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 2 स्टॅम्प साइज छायाचित्र आणि आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्र आवश्यक आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येणा-या प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर  11, 12 व 13 जुलै रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 20 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, वेदांत कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन उपआयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.