डि.एस.व्ही.त 8500 रुपयांची पगारवाढ

नवी मुंबई,7 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील डि.एस.व्ही. केमिकल कंपनीतील कामगारांना 8500 रुपयांची पगारवाढ देण्यात आली आहे. नवी मुंबई जनरल कामगार संघटना आणि डि.एस.व्ही. कंपनी व्यवस्थापनात याबाबतचा करार नुकताच करण्यात आला.

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील नवी मुंबई जनरल कामगार संघटनेने डि.एस.व्ही. केमिकल कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पगारवाढ आणि इतर सोयी सुविधा देण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे कंपनीमधील कामगारांसाठी झालेल्या चार वर्षांच्या करारानुसार कामगारांना 8500 रुपयांची पगारवाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर 20 टक्के बोनस, मेडिक्लेम, छत्री, टॉवेल आणि थकबाकीपोटी प्रत्येक कामगाराला 50 हजार रुपये मिळणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई जनरल कामगार संघटना ही एकमेक संघटना आहे की, जी मालक आणि कामगार यांच्यामते समन्वय साधत तोडगा काढते. त्यामुळे कंपनी आणि कामगार यांच्यातील संबंध विश्वासाचे असल्याचे मत कंपनीचे मालक धनंजय साठे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या करारावर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पि.के. रामण, उपाध्यक्ष वैभव पाटील तर कंपनीतर्फे व्यवस्थापकीय संचालक धनंजय साठे, सल्लागार एड.सईद मुल्ला, अनिल दानी, व्यवस्थापक प्रसन्न मानकामे आणि कामगार प्रतिनिधी म्हणून संजय कुरुंगळे, गजानन मुंढे, वसंत म्हात्रे, तुळशीराम देवधरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.