बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य

मुंबई 4 मार्च 2017/AV News Bureau :

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता मंडळाकडून दर तीन वर्षांतून एकदा पाच हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेचा फायदा राज्यातील 5 लाखांपेक्षा अधिक कामगारांना होणार आहे. या योजनेमुळे आता बांधकाम कामगार नोंदणी करण्यास पुढे येतील आणि त्यामुळे अश्या कामगारांचे बँक खाते, आधार कार्ड तयार करण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या कौशल्याला प्रोत्साहित केले जाणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटीलनिलंगेकर यांनी दिली.

बांधकाम कामगारांना अवजारे खरेदी करण्याकरिता अर्थसहायय मिळावे याकरिताचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावास उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने मान्याता दिली असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच (1 मार्च 2017) निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा फायदा बांधकाम कामगारांना दर तीन वर्षांनी एकदा घेता येणार आहे. तसेच पुढील तीन वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र बांधकाम कामगाराने मंडळाकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर योजनेंतर्गत देण्यात येणारे अर्थसहाय्य केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (DBT) लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

 सदर योजनेसाठी पात्रतेचे निकष :

  • लाभार्थ्यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असावे.
  • लाभार्थ्यांची नोंदणी जिवीत असावी.
  • लाभार्थीचे बँकेत खाते असावे व त्यांनी अर्जात बँकेच्या खात्याचा तपशील द्यावा.
  • लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • पुढील 3 वर्षानंतर लाभ घेण्यासाठी अशा बांधकाम कामगारांची मंडळाकडे सलग तीन वर्षे नोंदणी असणे अनिवार्य आहे.
  • एका कुटूंबातील अनेक व्यक्ती बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे नोंदीत असल्यास, सदर योजनेंतर्गत केवळ एकच लाभार्थी पात्र राहील.