तेंडुलकरची दोन खेळपट्ट्यांची सूचना नापसंत

मुंबई, 8 डिसेंबर 2016 :

रणजी क्रिकेट सामन्यांसाठी दोन वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापराव्यात हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सूचना एमसीसीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला पंसत पडलेला नाही. तेंडुलकरच्या सूचनेनुसार बदल केल्यास रणजी सामन्यांचे महत्वच कमी होईल, अशी भिती समितीला वाटत आहे.

मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या दोन दिवसीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत तेंडुलकरच्या सूचनेबाबत सांगण्यात आले.

समितीला वाटणारी भिती

समितीचे सदस्य आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रमीज राझा यांना सांगितले की, प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमधून क्रिकेटपटू क्रिकेट खेळणे आणि त्यातील आव्हाने यांचा सामना करण्यास शिकतात.त्यामुळे जर दोन वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापरण्यास सुरुवात केली तर प्रथम श्रेणी क्रिकेटचे महत्वच कमी होईल. रमीज राझा यांच्याप्रमाणे समितीचे अध्यक्ष आणि इंग्लंडचे माजी कर्णधार माइक बियर्ले यांनीदेखील प्रथम श्रेणी सामन्यांसाठी दोन खेळपट्ट्या वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिल्ली येथील एका कार्यक्रमादरम्यान रणजी सामन्यांसाठी दोन खेळपट्ट्या वापरणे फायद्याचे ठरेल, असे मत व्यक्त केले होते.