शिवसेनेचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात

गुलाबराव गावंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

नागपूर, 16 डिसेंबर 2016/ AV News Bureau :

शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी आ.प्रकाश गजभिये, माजी आ.दिपक साळुंखे-पाटील, युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गावंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
मला विविध पक्षातून प्रवेशासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांशी नाळ असलेला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे खा. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे गुलाबराव गावंडे यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत अकोला येथे जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या सभेतच शिवसेना सोडण्यामागची पार्श्वभूमी जाहीरपणे सांगू असे गावंडे यांनी स्पष्ट केले.