कोंढाणे धरण विकसित करून पनवेलची तहान भागवणार

पनवेल,8 एप्रिल 2017/AV News Bureau:

कोंढाणे धरण सिडकोमार्फत विकसित करून पनवेल महानगरपालिका आणि नयना परिसराची वाढीव पाण्याची गरज भागविण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित  पाटील यांनी गुरुवारी  मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिले

पनवेल तालुक्यातील विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली, आदर्इ या ग्रामपंचायतींना सुरळीत पाणी पुरवठा मिळण्यासाठी सिडको नैना, एमआयडीसी, एमजेपी, एनएमएमसी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार ना. डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबर्इत गुरुवारी बैठक पार पडली.

 पनवेल महानगरपालिका हद्दीच्या जवळ असलेल्या विचुंबे, देवद, पालीदेवद, आकुर्ली व आदर्इ या ग्रामपंचायतीमधील गावांचे झपाटयाने नागरीकरण होत असून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येमध्येही झपाटयाने वाढ होत आहे. या ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठयाचा दुसरा स्त्रोत उपलब्ध नाही, त्यामुळे  नवी मुंबर्इ महानगरपालिकेकडून उपलब्ध होणारया पाणी पुरवठयावर विसंबून रहावे लागते. मात्र लोकसंख्या वाढीमुळे हा पाणी पुरवठा अत्यंत अपुरा पडत आहे. पाणी टंचार्इचे सावट भेडसावत असल्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत, त्यामुळे या ग्रामपंचायतींना सुरळीत पाणी पुरवठा होणे गरजेचे असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत नमूद केले.