सुधारीत वेतनासाठी कंत्राटी कामगारांची रोज निदर्शने

ठाणे महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांचा आक्रोश

ठाणे, 23 डिसेंबर 2016/ AV News Bureau :

महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कामगारांना सुधारित वेतन देण्याचा निर्णय घेवूनही ठाणे महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडून त्याबाबत योग्य ती अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सुधारीत वेतना तातडीने मिळावे या मागणीसाठी २० डिसेंबरपासून कंत्राटी कामगारांनी महापालिका मुख्यालयासमोर रोज निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने सुधारीत वेतन देण्याचा  निर्णय २४ फेब्रुवारी २०१५ रोजी घेतला. तेव्हापासून सुधारीत वेतन देण्यात यावे, ही मागणी मान्य करण्यास ठाणे महानगरपालिकेला नोव्हेंबर २०१६ उजाडावं लागले. महानगर पालिका आयुक्त संजीव जयसवाल यांनी नोव्हेंबर महिन्याचे पगार डिसेंबर २०१६ मध्ये देण्याची घोषणाही केली होती. पण महिना संपत आला तरी कामगारांना पगार देण्यात आलेला नाही. काही कंत्राटदार जुन्या पद्धतीने वेतन घेण्याचा दबाव कामगारांवर करत आहेत.सुधारित दराने वेतन न मिळाल्यामुळे कामगारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत,असे श्रमिक जनता संघ या कामगार संघटनेचे सचिव जगदिश खैरालिया यांनी सांगितले.

केवळ विनंती करून काम होईल असे आम्हास वाटत नाही. म्हणूनच आम्ही श्रमिक जनता संघ या युनियन तर्फे मंगळवार, २० डिसेंबर पासून रोज दुपारी  ३.३० ते ४.३० ठाणे महापालिके समोर निदर्शने करण्याचे आंदोलन सुरु केले आहे, असे खैरालिया यांनी सांगितले.

नोटबंदीच्या काळात घर चालविणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सुधारित वेतन मिळेपर्यंत हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका प्रशासन व सर्व कंत्राटदार याची योग्य ती दखल घेऊन कारवाई करतील अशी कामगारांची अपेक्षा आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा या मागणीचे एक निवेदन श्रमिक जनता संघातर्फे ठाणे पालिका आयुक्त व महापौर यांना देण्यात आले.