राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया आजपासून

मुंबई 14 जून 2017/AV News Bureau:

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने एक अधिसूचना जारी करून ही घोषणा केली आहे. 28 जूनपर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू राहणार असून आवश्यक असल्यास 17 जुलै रोजी निवडणुक घेण्यात येईल असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल 25 जुलैला संपणार आहे. एनडीए सरकार आणि विरोधी पक्षांची या पदासाठी चर्चा सुरू आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, अरुण जेटली आणि एम. व्यंकय्या नायडू यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत एनडीएचे घटकपक्ष आणि विरोधी पक्षांचा सहभाग असणार आहे.

या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्यांचे निवडून आलेले सदस्य मतदार आहेत. हे मतदान गुप्त पध्दतीने होत असते.