महिलांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असावा

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलात देशमुख यांचे मत

– स्वप्ना हरळकर

मुंबई,4 जानेवारी 2017/AV News Bureau:

राजकीय पक्षांमध्ये काम करणा-या महिलांसाठी महिला विंग आहे. मात्र या क्षेत्रात महिलांचा दबावगट निर्माण व्हायचा असेल तर आता महिलांचा स्वतंत्र राजकीय पक्षच स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचं परखड मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अविरत वाटचाल (AV) या न्यूज बेव पोर्टलचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी महिला सक्षमीकरणाबाबतचं आपलं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी अविरत वाटचालच्या संपादक स्वप्ना हरळकर, कार्यकारी संपादक सिद्धार्थ हरळकर, वेबस्टीर टेक्नॉलॉजीचे अरविंद यादव आदी उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात महिलांचं काम उल्लेखनीय आहेच. त्यातूनच राजकाणाकडे वळणा-या महिलांसाठी राजकीय पक्षांमध्ये महिला विंग आहे. मात्र त्यामध्येही पुरूषांचा शब्द अंतिम मानला जातो. महिलांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी आता स्वतंत्र राजकीय पक्षचीच गरज आहे. महिला सक्षमीकरणासाठी भारतीय राज्य घटनेने ठोस कायदे केले आहेत. त्यात सुधारणाही केल्या जात आहेत. मात्र केवळ ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरी भागातील महिलांनादेखील अजून महिलांविषयक कायद्यांची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे महिलांना त्यांचे अधिकार माहिती व्हावेत यासाठी वाचन आणि लिखाणाची आवश्यकता आहे. निर्णयप्रक्रियेतही त्यांचं मत निर्णायक ठरावं यासाठी राजकारणात महिलांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितलं

महिलाच महिलांसाठी उत्तम व्यासपीठ निर्माण करू शकतात. महिलांच्या चळवळी यशस्वी होतात. चार महिला एकत्र येऊन ठोस काम करू शकतात. त्याचे अनेक यशस्वी दाखलेही आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या महिलांनी आता स्वतःच्या राजकीय सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला राजकीय पक्षाची बांधणी करणं ही काळाची गरज बनली आहे, असं डॉ. देशमुख यांनी सांगितलं.