नियमांचे पालन करत साजरा होणार श्री बहिरीनाथाचा उत्सव

बहिरीनाथ दिपोत्सव मंडळ आणि दिवाळे ग्रामस्थ मंडळाचे भाविकांना आवाहन

  • तांडेल कुटुंबिय आणि काही मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 नोव्हेंबर 2020:

केरोना विषाणूबाधित रूग्णांचा आकडा कमी होत असला तरिही हे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे उत्सवाच्या का काळातच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. या वातावरणातच नवी मुंबईतल्या दिवाळे गावांत सरकारने आखून दिलेल्या नियमांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेवून आणि पारंपरिक पध्दती जपत बहिरीनाथाचा उत्सव साजरा होणार आहे. उत्सव असला तरिही भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत यंदा गावात तली आणि पालखी मिरवणूक होणार नसल्याचा निर्णय बहिरीनाथ दिपोत्सव मंडळाने घेतला आहे. यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. 

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाची ग्रामस्थ वर्षभर वाट पाहत असतात. प्रार्थनास्थळं बंद असतानाही देव गावात येत आहेत. त्यामुळे यंदाचा बहिरीनाथ उत्सव आणि देवाचे स्वागत विशेष असणार आहे. या अनन्य स्वागताला आपण थोडी संयमाचीही जोड देवूया. कारण कोरोनाने आपली दैनंदिन दिनचर्या आणि व्यवहार पार बदलून टाकले आहेत. कोरोनाचा नायनाट करण्याचा आपण सगळयांनी निर्धार केलेला आहे.  देवाच्या आगमनासोबतच कोरोनाशी दोन हात करण्याची शक्तीही आपल्या पदरी येणार याचा आम्हा सगळया भक्तांना विश्वास आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला लांब ठेवण्यासाठी शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करूयात. आतापर्यंत दाखवलेला हा संयम या बहिरीनाथाच्या उत्सवातही कायम ठेवून नवी मुंबईत एक आदर्श निर्माण करूयात, असे आवाहन बहिरीनाथ दिपोत्सव मंडळाचे अध्यक्ष अरुण कोळी यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिरीनाथाचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. मात्र यावेळी अनेक गोष्टींचे निर्बंध आपण स्वत: बाळगण्याची  नितांत गरज आहे. सर्वांच्या  साथीची यासाठी गरज आहेच. आपण शारिरिक अंतराच्या नियमांचं पालन करूयात कारण मनाने एकमेकांच्या जवळ आहोतच. गावाचा उत्सव ही आपली शान आहे आणि आता तो इतरांसाठी आदर्श असणार आहे.

बहिरीनाथाच्या उत्सवादरम्यान दिवाळे ग्रामस्थांनी स्वेच्छेने काही गोष्टींचे पालन करायचे आहे. 

१. श्री बहिरीनाथाचा आगमन सोहळा हा यंदा तांडेल कुटुंबिय आणि काही मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पाडावयाचा आहे. या आगमन सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे ढोलताशा, बॅंड आदींचा वापर कटाक्षाने टाळायचा आहे.

२. १५ नोव्हेंबर देवाचा पालखी सोहळा होणार नसला तरी श्री बहिरादेवीचे स्वरुप असलेला मुखवटा घेवून संध्याकाळी ६ वाजता पालखी गाव प्रदक्षिणा करेल.

३. देवाचा मानाचा दिवस‚ दरवर्षीप्रमाणे यंदा नवस फेडण्याची प्रथा यावेळी खंडीत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची गर्दी उसळू नये यासाठी यंदाचा नवस पुढच्यावर्षी फेडण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी परिस्थितीचे गांभिर्य पाहून सहकार्य करावे ही नमÏ विनंती.

४. मुखदर्शन सोहळ : सोहळ्यादरम्यान मंदीर गाभा‚यात तांडेल कुटुंबियांव्यतिरिक्त कोणीही प्रवेश करणार नाही. आपण सर्वांनी मुखदर्शन घ्यायचे आहे. ठराविक वेळेनंतरच मुखदर्शन घेता येणार आहे. देव गावात आहेत म्हटल्यावर आपलं मन त्यांच्या दर्शनासाठी आतुर होणार आहेच पण यंदा त्यासाठी थोड्या संयमाची गरज आहे. हार, तुरे, नारळ यांचा वापर यावर्षि नकोच. आपल्या नातेवाईकांनाही यंदा गावात न येण्याची विनंती करूयात आणि हो देवाच्या मुख दर्शनासाठीही मास्क बंधनकारकच आहे. सॅनिटायझरने हात वारंवार धुवायचे आहेत.

५. देवाचे आगमन आणि विसर्जन यासाठी देवाची होडी जाणार आहे. त्याव्यतिरिक्त कोणाही होडी समुद्रात आणू नये अन्यथा होडीचा नोंदणी क्रमांक घेवून त्यावर पोलीस नियमानुसार कारवाई करणार आहेत.

६. कोरोना जास्त पसरू नये यासाठी वायूप्रदूषण टाळायचं आहे. त्यामुळेच आपणही फटाक्यांचा वापर नकोच करूयात.

७. या उत्सवाची सोशल मिडियावर प्रसिध्द करायची नाही असा निर्णय एकमाने घेण्यात आला आहे.

. कोरोना विषाणू दिसत नाही पण आजही आपल्या आजूबाजूला आहे. त्यामुळे आपल्यामुळे तो इतरांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. या दरम्यान सर्दी, खोकला, ताप असणा‚या ग्रामस्थांनी या उत्सवात सहभागी होवू नये. आपली आणि इतरांची काळजी घ्या.

आपला गाव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, गाव एक कुटुंबच आहे. ते सुरक्षित राहावं यासाठी थोड्या संयमाची आणि निर्धाराची गरज आहे. चला तर मग, सर्व बंधनं पाळत देव बहिरीनाथाचं स्वागत करूया असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.

=======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा