लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मतदार नोंदणी व मतदान करा

नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 मार्च 2024

  आगामी सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शहारातील अधिकाधिक मतदारांनी आगामी लोकसभा निवडणूकीत मतदान करून लोकशाहीला सक्षम करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

त्यादृष्टीने मतदारांनी ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline हे मोबाईल ॲप वापरा तसेच प्रत्यक्ष मतदार नोंदणीसाठी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले असून मतदार नाव नोंदणी झाल्यास त्याचा आगामी काळातील महानगरपालिका निवडणूकांसाठी फायदा होणार आहे, असेही सूचित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 150-ऐरोली व 151-बेलापूर हे दोन विधानसभा मतदार संघ येतात. मतदार जनजागृती व्यापक स्वरूपात व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वर्दळीच्या ठिकाणी परिमंडळनिहाय मतदार जनजागृतीचे बॅनर/ फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. तसेच मतदार जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून मतदार नोंदणीचे आवाहन मनोरंजनातून प्रबोधन स्वरूपात करण्यात येत आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या जिंगल्स नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्यांवर प्रसारित करण्यात आल्या आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध सहकारी संस्था, बॅंका, कारखाने,  पतसंस्था इत्यादी  ठिकाणी  स्टिकर्स छपाई करून मतदार नोंदणी करणेबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

========================================================