महाराष्ट्र असर-२०१६ अहवालाचे प्रकाशन

मुंबई, 20 जानेवारी 2017/AV News Bureau:

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रथम या सामाजिक संस्थेच्यावतीने  प्राथमिक शिक्षणाच्या परस्थितीचा आढावा घेणारी असर या राष्ट्रीय पहाणीचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा महाराष्ट्र असर-२०१६ च्या अहवालाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथमने केलेल्या सर्वेक्षणासाठी सहकार्य केलेल्या ३४ एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित हेाते. प्रथम शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने झालेल्या सर्वेक्षणात अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्था, डिआयइटीचे विद्यार्थी आणि  व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

असर हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील ३३ ग्रामीण जिल्ह्यात ९७३ गावातील १९,४३० घरांमध्ये करण्यात आले. महाराष्ट्रात ११ सामाजिक संस्था, २३ विश्वविद्यालय आणि महाविद्यालयांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील या सर्वेक्षणात ३ ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आणि ५ ते १६ वयोगटातील मुलांची सोपे वाचन व गणिताची चाचणी घेण्यात आली.

भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची चांगली प्रगती या अहवालात आढळून आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळांची इ. ५ वी ची ५१.७% मुले २०१४ मध्ये इ. २ रीच्या क्षमतेचा परिच्छेद वाचू शकत होती. हे प्रमाण २०१६ मध्ये ११% नी वाढले असून यंदा हे प्रथम ६२.७% झाले आहे. महाराष्ट्रातील शाळांमधील सुविधेत वाढ झाली आहे. तसेच भारताच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्रात मुलांची आणि शिक्षकांची अधिक उपस्थिती आढळून आली आहे. खाजगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची चांगली कामगिरी या पाहणीमध्ये आढळून आली आहे.

२०१६ चे ११ वे असर सर्वेक्षण हे एका वर्षाच्या अंतराने राष्ट्रीय स्तरावर झालेले आहे. २०१४ मध्ये १० वे असर सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावर झाले होते. महाराष्ट्रात २०१५ मध्ये देखील असर सर्वेक्षण झाले होते.