कचरा वेचक महिलांना ओळखपत्र

नवी मुंबई,20 जानेवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई शहरातील कचरा वेचक महिलांना महापालिकेच्या सहकार्याने ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कचरा वेचक महिलांना एक हजार हातमोजे वितरित करण्यात आले.

याकार्यक्रमाला स्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, केमिस्ट असोसिएशनचे सुनिल छाजेड, अध्यक्ष जेजूरकर, सचिव नलावडे, प्रा.वृषाली मगदूम आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कचरा वेचक महिला त्यांच्या कामातून पर्यावरणाचा ऱ्हास तसेच प्रदूषण रोखण्यासाठी मदत करतात. स्री मुक्ती संघटना आणि महापालिका यांनी कचरा व्यवस्थापनाचे काम संयुक्तपणे केले तर शहराच्या स्वच्छतेबरोबरच कचरा वेचक महिलांनाही पाठबळ मिळेल, असे मत स्रीमुक्ती संघटनेच्या समन्वयक प्रा.वृषाली मगदुम यांनी व्यक्त केले.

कचरा वेचक महिलांनी त्वचाविकार आणि इतर संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.तसेच कचरा वेचक महिलांना वेळोवेळी वैद्यकीय मदत देण्यात येईल,  असे केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुनिल छाजेड यांनी सांगितले.  यावेळी ज्योती म्हापसेकर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा गायकवाड यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मिनाक्षी वायंगणकर, सीमा किसवे, पूजा डवले, संघमित्रा आदींनी परिश्रम घेतल्याची माहिती मगदूम यांनी दिली.