संघर्ष यात्रेची सांगता ही आंदोलनाची सुरुवात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  खा. अशोक चव्हाण

पनवेल 4 एप्रिल 2017/AV News Bureau:

संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता ही तर शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाची सुरुवात असून राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरुच राहील असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सर्व विरोधी पक्षांनी काढलेल्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज पनवेल येथे विराट जाहीर सभेने झाला. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारच्या काळात नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात प्रगतीत देशात पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. या सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. या सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही. रोज शेतकरी मरत आहेत पण सरकारकडे संवेदनाच शिल्लक नाहीत. या सरकारला जागे करण्यासाठी शेतक-यांना न्याय देण्यासाठी ही संघर्षयात्रा काढली आहे, असे चव्हाण म्हणाले.