नवी मुंबईसाठी तीन नवी पोलीस ठाणी

नव्या पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावाला गृहमंत्रालयाची तत्वतः मंजूरी

स्वप्ना हरळकर/AV News :

नवी मुंबई, 21 जानेवारी 2017:

नवी मुंबई शहराची लोकसंख्या आणि विस्तार वाढत आहे. त्यामुळे शहरातील तीन पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने तीन स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण केली जाणार आहेत. ऐरोली, जुईनगर, उलवे ही तीन पोलिस ठाणी निर्माण होणार आहेत. पोलिस महासंचालकांनी हा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला गृहमंत्रालयाकडून तत्वतः मंजूरी मिळाली आहे. ही नवीन पोलीस ठाणी मे अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता अाहे.

सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 20 पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर आहे. शहरात वाढणारी गुन्हेगारी, नवीन गृहनिर्माण प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उलवे शहराला आलेले महत्व, या पार्श्वभूमीवर  नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला गृहमंत्रालयाकडून तत्वतः मंजूरी मिळाली आहे. याबाबतचा जीआर लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

  • प्रस्तावित नवीन पोलीस ठाणी

रबाले पोलीस ठाण्याच्या हद्दीचे विभाजन करून ऐरोली हे नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीचे विभाजन करून जुईनगर आणि एनआरआय सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीचे विभाजन करून उलवे अशी नवीन पोलीस ठाणी निर्माण केली जाणार आहेत.

  • अधिक पोलीस बळ

नव्याने निर्माण होणाऱ्या तीन पोलीस ठाण्यांमध्ये अतिरिक्त पोलीसबळ दिले जाणार आहे. त्यासाठी सुमारे 185 मनुष्यबळ दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.