महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवण्याचा निर्धार करूया

राज्यपाल सी. विद्यासागर राव राज्यपाल यांचे आवाहन

मुंबई26जानेवारी 2017:

 देशातील प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्रालाअग्रस्थानी ठेवून, भविष्यात विकासाची सतत नवनवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करूया, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सेना दल, तटरक्षक दल, पोलीस दल आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या संविधानातील लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी, आपली बांधीलकी अधिक दृढ करण्यासाठी आणि देशाच्या तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करण्यासाठी स्वत:ला वचनबद्ध करण्याचा हा दिवस आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या अन्य सदस्यांना मी याप्रसंगी नम्रपणे आदरांजली अर्पण करतो. लोकशाही व समाजवादी व्यवस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दीर्घ व खडतर मार्ग आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे. आज आपण मागे वळून पाहिले असता, जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या संघटित प्रयत्नांतून प्रगती करणे शक्य झाल्याचे आम्हाला समाधान वाटते. आपल्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल विचारात घेऊन सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस, मुंबई रेल्वे पोलीस दल, सशस्त्र गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, मनपा सुरक्षा दल, वन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅडेट कोअर, मुंबईतील विविध विद्यालयातील मुले आणि मुलांची आरएसपी दले, विविध शाळांमधील मुले आणि मुलींची भारत स्काऊट आणि गाईड्सची पथके, बृहन्मुंबई पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांची बॅण्ड पथके, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बँड पथक, वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक आदी विविध दलांनी संचलन केले. याप्रसंगी नौदल, पोलीस दल यांची वाहने तसेच महिला सुरक्षा पथक व्हॅन, महारक्षक बुलेटप्रुफ व्हॅन, वरूण वॉटर कॅनन आदी वाहनेही संचलनात सहभागी झाली होती. तसेच वन विभाग, गृहनिर्माण विभाग, ऊर्जा विभाग, एमएमआरडीए, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी, राज्य निवडणूक आयोग, नगरविकास, वाहतूक पोलीस, उद्योग आदी विविध विभागांच्या चित्ररथांनीही आपले सादरीकरण केले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम ,आमदार तृप्ती सावंत, आदींसह स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक, स्थानिक नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. यावेळी लोकमान्य विद्यामंदीर, साकी नाका,टिळक या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँडपथकाद्वारे संचलन केले.

वर्षा निवासस्थानीध्वजारोहण

प्रजासत्ताकदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारीउपस्थित होते.

ठाणे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी साकेत मैदान येथे मुख्य शासकीयसोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राज्य राखीव दलापासून, ठाणे शहर पोलीस, वाहतूक पोलीस, कारागृह रक्षक, गृहरक्षक, कमांडो पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, दंगारोधक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परम वीर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. शहापूर येथील समृद्धी संस्थेने यावेळी तारपा नृत्य तर बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले.