महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांची कबुली

 मुंबई, २ फेब्रुवारी २०१७/AV News Bureau:

सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. या कामात  हयगय करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला आहे.

महावितरणच्या चार प्रादेशिक संचालकांसह सर्व १६ परिमंडलातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत संजीव कुमार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिक गांभिर्याने कार्यरत व्हावे, असे निर्देश दिले.

light wire

 

  • महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट

महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सातत्याने वीज वसुली मोहिमा राबवाव्यात, विशेषतः कायमस्वरुंपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीबरोबरच चालू वीजबिल पूर्णपणे वसूल करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, त्यांचे क्रॉस चेकींग करूंन जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील तर त्याच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

  • अचूक बिलिंग यंत्रणा सक्षम करावी

ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिलिंग होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी, ग्राहकांच्या मोबाईल नोंदणीचे प्रमाण वाढवावे तसेच कर्मचार्‍यांनी दैनंदिन कामकाजात मोबाईल अ‍ॅपचा वापर करूंन कामात गतीशिलता व पारदर्शकता आणावी, असे आदेश कुमार यांनी दिले आहेत.