लसीकरणासोबत आरटीपीसीआर व ॲन्टीजन चाचण्या वाढवा

ठाणे महापालिका आयुक्त- डॉ. विपिन शर्मा

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 9 डिसेंबर 2021:

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आढावा घेवून सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देतानाच शहरात लसीकरणासोबत आरटीपीसीआर व ऍन्टीजन चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुविधांबाबतची आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप आयुक्त मारुती खोडके, मनीष जोशी, अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, वर्षा दीक्षित, अश्विनी वाघमळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या कोविड रुग्णालयात आवश्यक औषधसाठा, व्हेटीलेंटर्स, ऑक्सीजन सुविधा व इतर वैदयकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ठाणे शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांशी दैनंदिन संपर्क साधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे व आवश्यकता भासल्यास त्यांना क्वाँरंटाईन करणे, यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही  महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रभागसमिती स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच शहरातील प्रमुख मार्केटमध्ये असणाऱ्या कामगारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे की, नाही याची पडताळणी करण्याचे आदेशही सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

लसीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांनाच परिवहन बसमध्ये प्रवेश

दरम्यान परिवहन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची संख्या वाढत असून कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केलेल्या नागरिकांनाच प्रवासाची मुभा देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी परिवहन विभागास दिले. याकरिता परिवहन बसेसचे प्रमुख थांबा असणाऱ्या सॅटिस, लोकमान्यनगर, वागळे, कळवा व इतर ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी करूनच बसमध्ये प्रवेश देण्याचे आदेश परिवहन विभागास दिले.

——————————————————————————————————