जुईनगर सेक्टर 24 मधील ट्री बेल्टमध्ये वृक्षारोपण करा

आरक्षित भूखंडावर उद्यान विकसित करण्याची काँग्रेसची मागणी

नवी मुंबई, 5 जुलै 2017/AV News Bureau:

जुईनगर सेक्टर 24 परिसरातील स्मशानभूमीलगत ट्री-बेल्टसाठी राखीव असलेल्या भूखंडावर वृक्षारोपण करावे तसेच उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरही तातडीने उद्यान विकसित करावे, अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सावंत यांनी मंगळवारी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले.

ट्री-बेल्टसाठी व उद्यानासाठी  भुखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र महापालिकेकडून सदर ट्री बेल्ट विकसित करणे तसेच उद्यान विकसित करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. याप्रकरणी रवींद्र सावंत पालिका प्रशासनाकडे गेल्या काही वर्षापासून वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत आहेत.

जुईनगर सेक्टर २४ मध्ये ट्री बेल्ट आणि उद्यानासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आलेले आहेत. मात्र पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देत असताना नवी मुंबई महापालिका प्रशासन मात्र ट्री-बेल्टसाठी आरक्षित भुखंडावर स्थानिकांकडून मागणी करूनही वृक्षारोपण केले जात नाही. आजही हे भूखंड अविकसित आहेत. राज्य सरकारच्या पर्यावरणीला चालना देण्याच्या धोरणाला महापालिका प्रशासनच हरताळ फासत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

कोणत्याही प्रकारची विकासकामे न केलेल्या या भूखंडावर आता डेब्रीज पडलेले दिसून येते. सध्या पावसाळा सुरू असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आजार पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी या भुखंडावर पालिका प्रशासनाने वृक्षारोपण करावे अन्यथा आम्हाला परवानगी दिल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ट्री बेल्टच्या जागेवर वृक्षारोपण व संवर्धन करण्याची तयारी असल्याचे रवींद्र सावंत यांनी पालिका व्यवस्थापनाला  सांगितले.