दिवा –पनवेल रेल्वे मार्गालगत जिलेटीन कांड्या

gelatin sticks

दोन दिवसांपूर्वी याच मार्गाच्या रुळावर लोखंडी तुकडा सापडला

नवी मुंबई, 9 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

कळंबोली पोलीस ठाण्यापासून सव्वा कि.मी अंतरावर दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरच लांबलचक लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आल्याची घटना ताजी असतानाच आता या मार्गालगत आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तळोजा पोलिसांनी सर्व जिलेटीन कांड्या जप्त केल्या असून याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.

दिवा-पनवेल रेल्वे मार्गालगत पनवेलकडे जाणाऱ्या 61/8 ते 10 दरम्यानच्या रुळालगत जिलेटीनच्या कांड्या पडलेल्या होत्या. ही बाब रेल्वेच्या कर्मचाऱ्याला दिसून आली. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राजेंद्र पाटील आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्याने दाखविलेल्या ठिकाणी तीन पूर्ण आणि एक अर्धी जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या जिलेटीन कांड्यावर डेक्कन पॉवर, डेक्कन एक्सप्लोटेक प्रा. लि.यवत, तालुका दौंड, पुणे असे लिहिल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र बुधवंत यांनी दिली.

दरम्यान, 7 फेब्रुवारीला याच दिवा –पनवेल रेल्वे मार्गावरील रुळावर लोखंडी तुकडा ठेवलेला आढळून आला होता. 02821 ही पुणे-सात्रांगाची एक्सप्रेसखाली हा तुकडा आला होता. मात्र मोटरमन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली होती. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारीला पनवेल-जेएनपीटी रेल्वे मार्गावरील कोपर गाव गव्हाण फाटा येथे रेल्वे रुळाला लागूनच सात फूट लांबीचा विद्युत खांब ठेवल्याचे आढळून आले होते. मात्र मालगाडीच्या मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

या दोन्ही गोष्टी एकामागोमाग उघडकीस आल्या असतानाच आज पुन्हा दिवा-पनवेल रेल्वे मार्गालगत जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली.