शहरातील 98 तबेल्यांवर कारवाई होणार

नवी मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरात अनधिकृत ठरवल्या गेलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाईचा भाग म्हणून शहराच्या विविध भागांत असणाऱ्या तब्बल 98 तबेल्यांवर  आता कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील तबेल्यांचे डिसेंबर 2015 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा जुलै 2017 मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सध्या शहरातील सुमारे 94 तबेले अनधिकृत असून संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कागदपत्रांची तपासणी करूनच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीतील यादवनगर, ऐरोली, देवीधाम नगर, चिंचपाडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात तबेले आहेत. हे तबेले अनधिकृत आहेत. शिवाय नागरी वस्त्यांमध्ये असल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या तबेल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली असून बुधवारी 4 तबेल्यांवर कारवाई करण्यात आली असून 4 म्हशी, 4 गाई आणि 1 बछडा ताब्यात घेवून वाशीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.