दानवेंच्या विधानाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे आव्हान

मुंबई, 11 मे 2017:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे अक्षम्य अनास्था व कोडगेपणाचे प्रतिक आहे. दानवेंच्या  या विधानाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

जालना येथे जाहीर सभेत दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह भाषेचा विखे पाटील यांनी तीव्र निषेध केला. शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान अवमान तरी करू नये. मागील काही काळापासून  बळीराजाचे खच्चीकरण सुरूच होते. शिवीगाळ करण्याची कसर तेवढी शिल्लक होती. ती देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी भरून काढली,असे विखे पाटील म्हणाले.

एकिकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगून नवनवीन घोषणा करीत आहेत. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच लावणारी विधाने करीत आहे. या दुतोंडी भूमिकेतून शेतकऱ्यांप्रतीची अनास्था दिसून येते. शेतकऱ्यांचा घोर अवमान करणाऱ्या या विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका जाहीर केली पाहिजे. मुख्यमंत्री मौन बाळगून राहिले तर या विधानाशी ते सुद्धा सहमत असल्याचे स्पष्ट होईल, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.