धोनीने वनडे आणि 20-20 चे कर्णधारपद सोडले

मुंबई, 5 जानेवारी 17:

भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी याने एक दिवसीय आणि 20-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. धोनीच्या या धक्कातंत्रामुळे क्रिकेट वर्तुळातही खळबळ उडाली आहे. धोनीच्या या नव्या निर्णयामुळे आता कर्णधारपद कसोटी संघाची  धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीकडे येण्याची दाट शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि एकदिवसीय तसेच 20-20 क्रिकेट सामन्यांवर लक्ष केंद्रित केले.

आपल्या निर्णयाबाबत धोनीने बीसीसीआयला पत्र पाठविले आहे. त्यानंतर बीसीसीआयाने धोनीच्या निवृत्तीची माहिती प्रसिद्ध केली. कर्णधारपद सोडले असले तरी आपण क्रिकेट खेळणार असून नवोदीत खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन वर्षांत विराट कोहलीने चमकदार वैयक्तिक कामगिरी केली आहे. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने संघाला चांगले बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर भारतीय कसोटी संघ सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर आपल्या धडाकेबाज खेळीमुळे भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या धोनीची जादू आता काहीशी ओसरली आहे. त्यामुळे भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची वाटचाल सुरू राहणार याबाबत कुणाचे दुमत नाही. यापार्श्वभूमीवर काळाची पावले ओळखून महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपदाचा काटेरी मुकूट उतरवून ठेवून केवळ खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे क्रिकेट वर्तुळातील जाणकारांचे मत आहे.

धोनीची कामगिरी

  • महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी 20 आणि 2011 मध्ये भारतात झालेला एकदिवसीय स्पर्धेचे विश्वविजेतेपद मिळवले.  त्याचप्रमाणे सन 2013 मध्ये इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली.
  • धोनीने 199 वनडे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आणि 110 सामने जिंकला तर 74 मध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. याशिवाय 20-20 चे 72 सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून 41 सामन्यांत विजय तर 28 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.

कसोटी       एकदिवसीय   20-20       आयपीएल

सामने               90                283            73                 143

एकूण धावा   4876              9110          1112                3272

सरासरी       38.09             50.89       35.87             39.42

शतक                6                     9               0                     0

पन्नास         33                     61                0                   16

सर्वा. धावा    224                183              48                  70