योग्यवेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, 5 मार्च 2017/AV News Bureau:

शेतकऱ्यांची कर्ममाफी करण्यास आमचा विरोध नाही. त्यासाठी आम्ही अनुकूल आहोत. परंतु कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला पाहीजे.याआधी कर्जमाफीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिर्घकालीन लाभ मिळावा यासाठी योग्य तो निर्णय घेऊ आणि त्यादृष्टीने धोरण तयार करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला  सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

विरोधी पक्ष निराश झाले असून त्यांच्याकडे फारसे मुद्दे नसल्यामुळे तेच तेच विषय पुन्हा उपस्थित करीत असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, असेच सरकारचे धोरण आहे. केंद्राच्या सहाय्याने जलयुक्त शिवार योजनेमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. शेतीसाठी सतत वीज उपलब्ध व्हावी यासाठी सोलर फीडरची योजना राबविणयात येत असून त्यासाठी जागतिक बॅंकेच्या सहकार्याने पाच हजार गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानभरपाईसाठी ठोस पावले उचलली जात आहे. त्यांच्या अन्नधान्यासाठी खासगी गोदामेही उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • शिवसेना-भाजप एकत्रच

शिवसेना व भाजप दोन्ही सरकारमध्ये एकत्र आहेत. आम्ही निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांचीदेखील हीच भूमिका असल्याचेही मुख्यमत्र्यांनी यावेळी सांगितले.