इलेक्ट्रीक- इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा ई कचरा लाल डब्यातच टाकावा

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे नागरिकांना आवाहन

नवी मुंबई, 5 जून 2017/AV News Bureau:

पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला घातक असणारा ई कचरा वेगळा ठेवण्यासाठी नवी मुंबई शहरातील निवडक ठिकाणी लाल डबा ठेवण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या वापरात नसलेल्या इलेक्ट्रीक- इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा ई कचरा लाल डब्यातच टाकावा असे  आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेरूळ येथील वंडर्स पार्क मध्ये कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारीत करणा-या विशेष स्वच्छता मोहिमेच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द गायक-संगीतकार शंकर महादेवन, आरोग्य समितीच्या सभापती सलुजा सुतार, नगरसेवक रविंद्र इथापे आदिंसह महापालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

नवी मुंबई शहरात निर्माण होणा-या कच-याचे नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून महापालिकेच्या कचरा गाडीतही वेगवेगळा देणे आवश्यक आहे त्यामुळे कच-याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रीया अधिक सुलभ होईल असेही आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सांगितले.

सुंदरतेला अधिक सुंदर बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून याकरिता जी जी पावले उचलावी लागतील ती सगळे मिळून एकसाथ उचलूया आणि आपल्या नवी मुंबई शहराचा स्वच्छतेमध्ये देशातील आठवा क्रमांक अधिक उंचावण्यासाठी सक्रीय राहूया असे सांगत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी ओला व सुका कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी वेगवेगळा ठेवण्याची अतिशय सोपी पण अतिशय महत्वाची सवय रोजच्या जगण्यात सर्वांनी लावून घेऊया असे आवाहन केले.

संगीत हे लोकांच्या मनापर्यंत पोहचण्याचे महत्वाचे माध्यम आहे या अनुषंगाने स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी स्वच्छ नवी मुंबईचे ब्रँड अँबेसेडर तथा सुप्रसिध्द संगीतकार,गायक शंकर महादेवन यांनी स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी बनविलेल्या आपल्या आवाजातील स्वच्छतेची नवी जिंगल सादर केली.

ई कचरा संकलनासाठी या ठिकाणी असणार लाल डबा

  • इनॉर्बिट मॉल वाशी, वंडर्स पार्क नेरूळ, महापालिका मुख्यालय सीबीडी बेलापूर या तीन सार्वजनिक ठिकाणी लाल रंगाचे डबे असणार आहेत.
  • नागरिकांनी घरी ई-कच-यासाठी लाल रंगांचा स्वतंत्र डबा ठेवावा.
  • महापालिकेमार्फत पंधरवड्यातून एकदा ई-कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.