प्रशांत परिचारक दीड वर्षांसाठी निलंबित

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई,9 मार्च 2017/AV News Bureau:

विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद निवडणूकीच्या दरम्यान भारतीय सैन्य दलातील जवान  व त्यांच्या कुटूंबियांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांचे सदस्यत्व दीड वर्षासाठी निलंबित करण्याबाबतचा ठराव आज विधान परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यांच्या या वर्तनाची चौकशी करणे आणि घडलेल्या घटनेची सत्यता तपासून विशेषाधिकार भंग व अवमानाच्या संबंधात शिक्षेची सभागृहाला शिफारस करण्यासाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव मांडताना पाटील म्हणाले की, परिचारक यांच्या या वर्तनाची चौकशी करुन त्यांना कोणत्या शिक्षेची सभागृहाला शिफारस करावी यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  सभागृहाची उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीमध्ये महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, शरद रणपिसे, नीलम गोऱ्हे, भाई गिरकर, कपिल पाटील, जयंत पाटील हे सदस्य म्हणून तर विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे हे सदस्य सचिव म्हणून राहणार आहे.